औरंगाबाद - महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून सुभाष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुभाष पाटील यांनी बैलगाडीवर प्रचार फेरी काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
नारायण राणे यांनी शिवसेना ज्या ठिकाणी उमेदवार उभे करील, त्याठिकाणी आपण उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते. औरंगाबादेत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी सुभाष पाटील यांना उमेदवारी घोषित केली होती. अर्ज दाखल करण्यापूर्वी औरंगाबाद शहरात नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सुभाष पाटील हे औरंगाबादचे शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेला रामराम करत सुभाष पाटील मनसेत दाखल झाले होते. मात्र कालांतराने मनसेतही मन न रमल्याने सुभाष पाटील यांनी मराठवाडा विकास सेना ही स्वतःची संघटना उभी केली. शहरी आणि ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव चांगला असल्याने नारायण राणे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत त्यांची उमेदवार म्हणून निवड केली. औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी असल्याने आम्ही येथून निवडणूक लढवत असून आम्ही निवडणूक लढवत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. खासदार खैरे यांनी काहीच कामे केली नसल्याने आमचा विजय होईल, असा विश्वास सुभाष पाटील यांनी व्यक्त केला.