औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2019 च्या सरळ सेवा भरतीतील चालक तथा वाहकांची सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कोरोनाच्या काळात जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बससेवा बंद असल्याने आणि आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सरळ सेवा भरती सन 2019 अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, राज्य संवर्ग अधिकारी व अनुकंपा तत्वावरिल विविधपदावर प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीचे देखील प्रशिक्षण थांबण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले असून पुढील आदेशापर्यंत सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आदेश उपाध्यक्ष शेखर चित्रे यांनी दिले आहेत.
हेही वाचा - भाजपाच्या 'त्या' ट्वीटनंतर आली जाग, 21 जुलैला स्वाभिमानीकडून राज्यव्यापी 'दूध बंद आंदोलन'
जाहिरातीप्रमाणे 8022 संख्या होती प्रत्यक्षात मात्र 4500 कर्मचारी भरती प्रक्रियेद्वारे भरती झालेत. त्यामध्ये 3200 प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्यक्षात 1300 चालक तथा वाहक कर्तव्यावर आहेत. त्याचबरोबर राज्य संवर्ग - 150 आणि अधिकारी 82 कामावर रुजू झाले आहेत. कोरोना (कोविड-19) या महामारीमुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दि. 23 मार्च 2020 पासून एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे एसटी महामंडळाचे दररोज 22 कोटींचे उत्पन्न बुडत असून आजवर 2100 कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे 50 टक्केच वेतन देण्यात आले होते. त्यावर इंटक संघटना आक्रमक झाली होती.
भरती प्रक्रियेत दाखवण्यात आलेली राज्यातील जिल्हानिहाय संख्या...
- अहमदनगर - 56
- सातारा - 514
- सांगली - 761
- कोल्हापूर - 383
- नागपूर - 865
- चंद्रपूर - 170
- भंडारा - 407
- गडचिरोली - 182
- वर्धा - 268
- औरंगाबाद - 240
- जालना - 226
- परभणी - 203
- अमरावती - 230
- अकोला - 33
- बुलढाणा - 472
- यवतमाळ - 171
- धूळे - 268
- जळगाव - 223
- नाशिक - 112
- पूणे - 1647
- सोलापूर - 591
एकूण - 8022 इतक्या जागा भरण्यासाठी जाहिराती देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा - नवी मुंबई महापालिकेला माणसं मेल्याचा पण पुरस्कार द्या; भाजपा आमदाराची खरमरीत टीका
सरळ सेवा भरती सन 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवरच जाहिरात काढून भरती करण्यात आली होती. तर मग आता सेवा तात्पुरती खंडित कशासाठी? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.