औरंगाबाद - शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर खासदार इम्तियाज जलील यांनी आरोप करताच कोरोनाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले खासदार आणि शिवसेना आमदार आता आमने-सामने आले आहेत. शिवसेना आमदारांनी औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून कोणतीही काळजी करु नये, असा सल्ला दिला. शिवसेनेच्या या पवित्र्याने शहरातील राजकारण चांगलेच तापत आहे.
औरंगाबाद शासकीय रुग्णालयात गोर गरीब रुग्णांना उपचार मोफत व्हायला हवा. मात्र, शासकीय रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना गरज नसतानाही बाहेरून औषधे आणायला सांगत असून अधिष्ठातांच्या कानाखाली रुग्णांची फसवणूक होत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. परंतु, ही वेळ डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्याची आहे. खच्चीकरण करण्याची नाही, अशी टीका शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी केली आहे.
हेही वाचा... कोरोनाने आणले वैद्यकीय शिक्षण अडचणीत; क्लीनिकल पोस्टींग नसल्याने विद्यार्थ्यांपुढे सरावाचा मोठा प्रश्न
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालल्याने पहिल्यांदाच सर्व पक्षीय खासदार आणि आमदार यांनी एकत्र येत प्रशासनाला जाब विचारला होता. मात्र, अवघ्या चोवीस तासात खासदार जलील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले शिवसेना आमदार त्यांच्या विरोधात गेले आहेत. जलील यांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप करताच शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता कानन येळीकर यांची भेट घेत, त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला.
मागील साडेतीन महिन्यांपासून कोरोनाबधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचारी मेहनत करत आहेत. अनेक गंभीर रुग्ण चांगले करण्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहेत. आज त्यांच्यावर आरोप न करता त्यांचे मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. रुग्णालयाच्या अडचणी आम्ही सरकार दरबारी मांडू, त्या सोडण्याचा प्रयत्न करू. अशा आरोपांमुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण होईल. त्यामुळे शिवसेना आमदार रुग्णालयातील डॉक्टरांच्या पाठीशी आहे, हे सांगण्यासाठी इथे आलो असल्याे आमदार दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा... 'संरक्षण मंत्री असताना 1962 ची चूक तुम्ही का दुरुस्त केली नाही?'; नितीन राऊत यांचा शरद पवारांना सवाल
खैरेंच्या टीकेमुळे खासदारांना विरोध असल्याची चर्चा...
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने खासदार जलील यांनी लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ यांच्यासह भाजप आमदार अतुल सावे आणि राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांनी प्रतिसाद दिला. या बैठकीत प्रशासनाला कोरोनाच्या गंभीर स्थितीबाबत जाब विचारण्यात आला. मात्र, त्याचवेळी जाब विचारण्यासाठी खासदार जलील यांची गरज आहे का? असा प्रश्न माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर शिवसेना आमदारांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांची पाठराखण करत जलील यांच्या विरोधी भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.