औरंगाबाद - पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन बसमध्ये 40 वारकऱ्यांच्या समवेत प्रस्थान झाले. यावेळी वारकऱ्यांनी पांडुरंगाचा जयघोष करत उत्साहात सोहळ्यात सहभाग घेतला. बसमधून पादुका जात असताना पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
सलग दुसऱ्या वर्षी बसने पालखी पंढरपूरला
मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट पाहता एकनाथ महाराजांच्या पालखीचे सलग दुसऱ्या वर्षी बसने प्रस्थान झाले. सकाळी 8 च्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण केले. वारकऱ्यांनी टाळ वाजवत, फुगडी खेळून रिंगण सोहळा साजरा केला. बाहेरील नाथ मंदिरात स्थानिक गावकऱ्यांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर रघुनाथबुआ गोसावी पालखीवाले यांनी पादुका हातात घेऊन बसकडे प्रस्थान केले. मंदिर ते बस दरम्यान भक्तांनी फुलांची उधळण करत पादुकांचे पूजन केले. त्यानंतर बसने नाथांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना झाल्या.
रोहियो मंत्री यांनी सोहळ्यात घेतला सहभाग
एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी सहभाग घेतला. मंदिराच्या बाहेर वारकऱ्यांसोबत भुमरे यांनी फुगडी खेळत आनंद सोहळ्यात सहभाग घेतला. मंदिरात पालखी निघत असताना संदीपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य आरती करण्यात आली. यावेळी मागील दोन वर्षांपासून जरी बसमध्ये पादुका जात असल्या तरी पुढच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा पार पडेल आणि पुन्हा एकदा वारीची परंपरा सुरू होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दुपारी चारपर्यंत पालखी पोहोचेल पंढरपूरला
पैठण येथून नाथांच्या पादुका घेऊन दोन शिवशाही बसच्या माध्यमातून चाळीस वारकरी सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाले. दुपारी चारच्या सुमारास पादुका पंढरपूरला पोहोचतील. तिथे गेल्यावर साधारणतः चार किलोमीटर पादुका पायी चालत नेण्यात येतील. मंगळवारी एकादशीनंतर काला झाल्यावर 24 जुलै रोजी पादुकांचे पैठण येथे पुन्हा आगमन होईल, अशी माहिती योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी दिली.
हेही वाचा - आषाढी वारी 2021 : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम