औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर खुद्द शरद पवारांनी राज यांनी त्यांचे आज्जोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तक वाचावेत असा टोला लगावला होता. त्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगला आहे. त्यात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली आहे. आपण राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असून, राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असे विधान दरेकर यांनी केले आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
भाजप राज्यभर घेत असलेल्या जण आशीर्वाद यात्रेवर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आमच्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वतःच्या चुकांकडेही पाहावे अस दरेकर म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती, युवासेनेचे झालेले कार्यक्रम पाहता त्यामध्येही मोठी गर्दी झाली होती. तसेच, बसमध्ये, विमानामध्ये कोरोना होत नाही, लोकलमध्ये होतो. अशा घटनांचा दाखला देत, आम्ही मागणी केल्यानंतर लोकल सुरू झाली असा दावाही दरेकर यांनी यावेळी केला आहे.
'मनसेचे कार्यकर्ते जवळ येत असतील तर चांगलच'
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे एकत्र येतील असे, चित्र उभे केले जात आहे. मात्र, अद्याप तरी तशी शक्यता नाही अस स्पष्टीकर दरेकर यांनी यावेळी दिले. मात्र, मनसेचे कार्यकर्ते जवळ येत असतील तर चांगलेच आहे. मनसे एक जबाबदार पक्ष आहे, कोणताही पक्ष जनतेचे काम करण्याचेच काम करतो. भाजप आणि मनसेत जर सलोख्याचे वातावरण होत असेल, तर ती गोष्ट स्वागत करण्यासारखीच आहे, असही दरेकर म्हणाले आहेत.