पैठण (औरंगाबाद): पोलीस असल्याचा बनाव करत दोन भामट्यांनी एकाला लुटल्याची घटना पैठणमधून समोर आली आहे. भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे राज्य महामार्गावरून प्रवास करण्याविषयी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस असल्याचे भासवत केली लुट
याविषयी सविस्तर वृत्त असे की, जालन्याच्या अंबडमधील बारसंवडामध्ये राहणारे भगवान गणपतराव गायकवाड (62 वर्षे) हे चार फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास पैठणला एका लग्नासाठी चालले होते. यावेळी पाचोडजवळच्या लिमगाव फाट्यापासून दोन अज्ञातांनी त्यांचा हॉर्न वाजवत पाठलाग करणे सुरू केले. यानंतर त्यांनी थेरगावजवळ त्यांना थांबविले. तसेच पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून त्यांची झाडाझडती घेणं सुरू केलं. यानंतर त्यांनी गायकवाड यांच्या हातातील सोन्याची एक तोळ्याची अंगठी आणि त्यांची कागदपत्रे त्यांच्या गळ्यात असलेल्या रुमालात गाठोड्यासारखी बांधून घेतली. यानंतर त्यांनी गायकवाड यांना अशा प्रकारे सोनं अंगावर घालून बाहेर निघायचं नाही असे सांगून त्यांना पुढे जाऊ दिले. मात्र गायकवाड यांना थोडे पुढे गेल्यावर शंका आली आणि त्यांनी गाठोडं सोडून बघितलं असता त्यातील त्यांची सोन्याची अंगठी आणि रोख दीड हजार रुपये दोन्ही भामट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी फाट्यावरील ग्रामस्थांना याची माहिती दिली आणि घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही भामटे तिथून पसार झाले होते. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरून प्रवास करण्याविषयी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.