औरंगाबाद - महिनाभरापूर्वी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही चारसोबिसी करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई न केल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या तक्रारदाराने शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला. तक्रारदाराने आत्महत्या केल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले. मंगळवारी सकाळी तक्रारदाराचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच गुन्हेगाराला पकडून त्याच्याविरुध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पण तक्रारदार पोलीस ठाण्यात चकरा मारत होता. त्यावेळी मात्र त्याच्या अर्जाला पोलिसांनी केराची टोपली दाखवली होती. अखेर मृत्यू झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुलींचा विवाह केल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या सुरेश शेकुजी पाटील (५३, रा. सुयोग कॉलनी, पदमपुरा) हे खडकेश्वर येथील डिजीटल बॅनर तयार करणाऱ्या एका कार्यालयात ते व्यवस्थापक होते. यांची नोव्हेंबर २०१९ मध्ये गंगापूर तालुक्यातील संजय गोविंदराव साबळे (रा. शिवराई) याच्याशी ओळख झाली. साबळे हा पाटील यांच्या घरी गेला. त्याला पाटील यांनी सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले. तेव्हा साबळेने त्यांना आपले भावजी शिडीर्तील एका बँकेचे संचालक आहेत. त्यांना सांगून २५ लाखांचे कर्ज काढून देतो असे म्हणाला. मात्र, त्यासाठी पाच लाख रुपये खर्च येईल असेही त्याने सांगितले. तर ही रक्कम टप्प्या-टप्प्याने दिली तरी चालेल असेही आवर्जुन सांगितले. त्याचवेळी त्याने पाटील यांच्याकडून बाबा पेट्रोल पंप येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे दोन कोरे धनादेश, दोन फोटो, आधार व पॅन कार्ड नेले. त्यानंतर वेळोवेळी घरी येऊन साबळेने पाटील यांच्याकडून एक लाख ५५ हजार रुपये नेले.
कालांतराने साबळेचा पुतण्या प्रफुल्ल नंदु साबळे (रा. भवानीनगर, जुना मोंढा) हा देखील पैसे घेण्यासाठी येऊ लागला. पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांनी क्रेडिट कार्डमधील ६२ हजार रुपये दोनवेळा साबळेला दिले. अर्धी रक्कम पोहोच झाल्यानंतर पाटील यांनी साबळेकडे विचारणा केली. तेव्हा त्याने आणखी पैशांची आवश्यकता आहे, असे सांगितल्यामुळे त्याला गुगल-पे, फोन-पेव्दारे एक लाख ५३ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय ५० हजार रुपये रोखीने देण्यात आले. साबळेला चार लाख २० हजार रुपये पोहोचल्यानंतरही त्याने कर्ज काढून देण्यासंबंधी कोणतीही हालचाल केली नसल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे पाटील यांनी त्याच्याकडे तगादा सुरु केला. तेव्हा साबळेने त्यांना आज-उद्या म्हणत वेळ मारुन नेण्यास सुरूवात केली.
साबळेची टाळाटाळ, धमकी...
कर्ज देण्याचे आमिष दाखवून साबळेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर पाटील दाम्पत्याने त्याचे घर गाठले. त्यावेळी साबळे व त्याच्या पत्नीने आठ दिवसात बँकेतून कर्ज काढून देतो असे सांगितले. त्याचवेळी दोघांनी पाटील दाम्पत्याला आपल्या घरी का आले, असेही धमकावले. तेथून परतल्यानंतर पाटील वेळोवेळी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. मात्र, तो मोबाईलवर संभाषण साधत नव्हता.
अखेर घेतला आत्महत्येचा निर्णय......
पाटील यांनी महिनाभरापुर्वी वेदांतनगर पोलीस ठाण्यात साबळे व त्याचा पुतण्या प्रफुल्ल यांच्याविरुध्द फसवणुकीचा तक्रारी अर्ज दिला होता. आत्महत्येच्या तीन दिवस अगोदर देखील पाटील यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची भेट घेऊन उपनिरीक्षक तडवी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पाटील यांनी बाथरुममध्ये प्रोफेक्स सुपर नावाचे विषारी औषध सेवन केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.