औरंगाबाद - वाळूज परिसरात एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या एकाला वाळूज पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक केली असून अपहरणाचा डाव उधळला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत, मुलाला त्याच्या आईने बोलावले असल्याचे सांगून, अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मुलाचे अपरण केल्याची घटना वाळूज परिसरात घडली आहे.
मुलाला त्याच्या आईने बोलावल्याचे सांगून केले अपहरण
सोमशेखर रुदया हिरेमठ हे त्यांच्या कुटुंबासह वडगाव येथे राहतात. सोमशेखर यांचे किराणा दुकान आहे, तर त्यांच्या पत्नी एका शाळेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, घरात कोणीही नसल्याची संधी साधत एका अज्ञात व्यक्तीने हिरेमठ यांच्या घरात घुसून त्यांचा मुलाचे अपरण केले. यावेळी मुलाला त्याच्या आईने बोलावले असल्याची थाप मारली व शौर्यला घेऊन तो अज्ञात व्यक्ती पसार झाला.
वीस लाखांची मागितली खंडणी
अपहरणकर्त्यांनी शौर्यला अज्ञात स्थळी ठेवल्यानंतर त्याच्या आई पोर्णिमा यांना संपर्क साधला. 'तुमचा मुलगा शौर्यचे मी अपहरण केले असून, तो माझ्या ताब्यात आहे' असे त्याने सांगितले. शौर्यची सुटका करायची असल्यास वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली.
पैसे घेण्याचे ठिकाण बदलले
अपहरणकर्त्यांनी पैशाची मागणी केल्यानंतर हिरेमठ कुटुंबीयांनी पैशाची व्यवस्था केली. दरम्यान पैसे कुठे आणून द्यायचे, अशी विचारणा केली असता त्याने सुरुवातीला हायटेक महाविद्यालय या ठिकाणी सांगितले. त्यानंतर महाराणा प्रताप चौक या ठिकाणी पैसे घेऊन बोलावले. यावेळी हिरेमठ यांच्यासोबत पोलीस आहेत का, हे जाणून घेण्यासाठी अपहरणकर्ता ठिकाण बदलत होता.
सापळा रचून केली सुटका
अपहरण झालेल्या शौर्यची सुटका करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संतोष याचे लोकेशन मिळवले. दरम्यान पोलिसांनी संतोषच्या घरासमोर सापळा रचला. यावेळी एका व्यक्तीला संतोषच्या घरी पाठवून आवाज देण्याचे सांगितले. ओळखीचा आवाज ऐकून संतोषने दार उघडले. संतोषने दार उघडताच पोलीस घरात शिरले. पोलिसांनी शौर्यला सुरक्षित बाहेर काढून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस आयुक्तांनी केले कौतुक
अपहरण झालेल्या मुलाची अवघ्या सहा तासांत वाळूज एमायडीसी पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी संबंधीत पोलिसांचे कौतुक केले आहे. यात पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, स.पो.नि. गौतम वावळे, राजेंद्र बांगर, विनोद परदेशी, मनमोहन कोलमी, बंडू गोरे, नितीन देशमुख आदींचा समावेश होता.
हेही वाचा - 'आम्हाला कोणाचीही विकेट घेण्याची गरज नाही'