औरंगाबाद - लॉकडाऊन शिथील झाल्यापासून चोरांनी शहरात धूमाकुळ घातला आहे. विशेष म्हणजे, चोरांनी दुकानांना टार्गेेट केले आहे. महिनाभरात सुमारे ४० दुकाने फोडून चोरांनी लाखो रुपयांचे साहित्य व ऐवज लांबवला आहे. जिन्सी पोलिसांनी चोरांकडून एक लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. फारुक अहमर शहा (२१, रा. संजयनगर, गल्ली क्र. ७), सागर कचरु खरात (२०, रा. उस्मानपुरा), सुयोग ऊर्फ सोनू संतोष जाधव (१९, रा. उल्कानगरी) तसेच दोन अल्पवयीन बालकाच्या मदतीने या टोळीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
शहराच्या विविध भागात दुकाने फोडणा-या टोळीने धुमाकुळ घातला आहे. गेल्या महिनाभरात चोरांनी शहर व परिसरातील सुमारे ४० दुकाने फोडले आहेत. दरम्यान, पुंडलिकनगर, गुन्हे शाखा आणि सातारा पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यानंतर शनिवारी जिन्सी पोलिसांनी तिघांना गजाआड करुन एक लाखांचे साहित्य जप्त केले आहे. तर दोन बालकांचा देखील चोरीत समावेश आहे.
शहरात १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री मुकेश मुलचंद शहा (५६, रा. दिवाण देवडी) यांचे जुना मोंढा परिसरातील ओस्वाल ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून रोख रक्कम, संगणक, डीव्हीआर, कॅमेरा, तेलाचे डब्बे असा एकुण ५४ हजार २१० रुपयांचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हेप्रकटीकरण शाखेने गुन्हा लगेचच उघडकीस आणला होता. चोरांनी लांबवलेले साहित्य जप्त करण्यात आले होते. मात्र, चोर पसार झाले होते. तत्पुर्वी या चोरांनी १३ आॅगस्ट रोजी मध्यरात्री राजेंद्रकुमार अर्जुनलाल बुरडक (३२, रा. गल्ली क्र. २, भानुदासनगर) यांचे आकाशवाणी रोडजवळ असलेल्या बालाजी अॅल्युमिनियम अॅन्ड ग्लास नावाच्या दुकानातून ६८ हजार ७४४ रुपयांचे साहित्य, एलईडी व रोख रक्कम या टोळीने लांबवली होती. तसेच ३ आॅगस्ट रोजी मध्यरात्री विष्णुकांत केदारनाथ दरख (५४, रा. सिडको, एन-३) यांच्या जुना मोंढा परिसरातील केदारनाथ मुरलीधर दरख नावाच्या होलसेल दुकानातून संगणक, काजु, बादाम, तेल, रोख रक्कम असा ३७ हजारांचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जिन्सी पोलिसांनी टोळीला पकडण्यासाठी तपासाचे चक्रे फिरवून सुरुवातीला फारुक शहा याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी साथीदार सागर खरात, सुयोग ऊर्फ सोनु जाधव यांना पकडण्यात आले. त्यांनी अल्पवयीन बालकांच्या मदतीने दुकाना फोडल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांच्याकडून रोख रक्कम, संगणक, साहित्य, किराणामाल, एलईडी असा एकुण एक लाख एक हजार ३५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, हारुण शेख, सिद्दीकी, संजय गावंडे, सुनील जाधव, गणेश नागरे, प्रविण टेकाळे यांनी केली.