औरंगाबाद - राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पक्षातर्फे डावलण्यात आलं आहे. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. सकाळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची गाडी मुंडे समर्थकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता मुंडे समर्थकांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या औरंगाबादमधील कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच कारवाई करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
जुन महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. रविवारी ( 12 मे ) सायंकाळी काही समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर जाऊन गोंधळ घातला. कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत त्यांनी पंकजा मुडेंना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी मुंडे आणि भागवत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत मुंडे समर्थकांना ताब्यात घेत कारवाई केली.
9 जुन रोजी देखील या समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर आले. 'पंकजा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,' अशा घोषणा दिल्या. तर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, तेव्हा कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आलेले कार्यकर्ते हे भाजपाचे नव्हते, असे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी दिलं होतं.
दरेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर हे बीड दौऱ्यावर होते. तेव्हा चौसाळा येथे पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यासाठी दरेकरांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरेकरांच्या ताफ्याने कार्यकर्त्यांना डावलल्याने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.