औरंगाबाद - मराठवाडा विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला औरंगाबादेत सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याची वेगळी बैठक होणार आहे. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने त्या बैठकीत उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज त्यांनी औरंगाबाद येथील बैठकीस दांडी मारली. त्यानंतर पंकजा मुंडेंनी बैठकीला हजर न राहण्याबाबत यापूर्वी परवानगी घेतली असल्याचे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
औरंगाबादेत भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला सुरुवात झाली. औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली आणि शेवटी बीड अशी जिल्हास्तरीय बैठक पार पडणार आहे. रात्री सातच्या सुमारास बीड जिल्ह्यातील भाजप नेते, आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक असणार आहे. भाजपच्या अंतर्गत विभागीय आढावा बैठक असून आगामी काळात पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत चाचपणी केली जात असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया राहिली होती. 30 डिसेंबरच्यापूर्वी ही प्रक्रिया पार पडली पाहिजे आणि जानेवारी महिन्यात नवीन अध्यक्षाची निवड झाली पाहिजे या अनुषंगाने राज्यात बैठक घेतल्या जात आहेत.
पंकजा मुंडे बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पंकजा मुंडे आजारी असल्याने त्याबाबत त्यांनी आधीच माहिती देऊन परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजरीबाबत कुठलीही शंका व्यक्त करण्याची गरज नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.