औरंगाबाद - नशेचे साहित्य आणण्यासाठी दुचाकी न दिल्याचा राग मनात धरून नशेखोरांनी तरुणाला धारधार शस्त्राने भोसकल्याची धक्कादायक घटना पडेगावातील कासम्बरीनगर भागात घडली आहे. सय्यद जमीर सय्यद जाहीर (वय-24) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत जमीर हा सिटीचौक भागातील इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात कामाला होता. काही नशेखोर नशेच्या गोळ्या, दारू, गांजा इत्यादी अमली साहित्य आणण्यासाठी त्याच्याकडून कायम दुचाकी नेत असे. नशेखोरांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळल्याने जमीरने दुचाकी देणे बंद केले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याची नवीन दुचाकी अज्ञातांनी फोडली होती. अलीकडच्या काळात जमीरने नशेखोरांना दुचाकी देणे बंद केल्याने ही हत्या करण्यात अल्याचे मृताचे वडील यांनी पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा सिन्नर येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू , पोलीस तपास सुरू
रात्रीच्या सुमारास जमीर कामावरून परत आल्यानंतर एक जण त्याला घरातून बोलावून बाहेर घेऊन गेला. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास नशेखोरांनी जमीरला मारहाण केल्याची माहिती व काही नागरिकांनी दिली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना जमीरचा मृत्यू झाला.
या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयितांची विचारपूस करत आहेत.
हेही वाचा वर्ध्यात पाचशे रुपयांच्या वादातून युवकाची हत्या; अल्पवयीन मुलाला अटक, वडील फरार
कासम्बरीनगराला नशेखोरीचा विळखा
कासम्बरीनगरात मोठ्या प्रमाणात कामगार तसेच मोलमजुर आहेत. याठिकाणी तरुणांमध्ये नशेखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गांजा, नशेच्या गोळ्यांचे व्यसन तरुणांना जडल्याने येथील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, टोळक्यांच्या भीतीने स्थानिक रहिवासी तक्रार देण्यास समोर येत नाहीत. तक्रार देणाऱ्यांनाही या नशेखोरांकडून त्रास दिला जातो, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. या परिसरातील नाशोखोरांना आवर घालण्याची मागणी देखील माध्यमांसमोर त्यांनी केली आहे.