औरंगाबाद - चलनातून बाद झालेल्या तब्बल 26 लाखांच्या नोटा शहर गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. कटकट गेट भागात काल (20जानेवारी) रात्री पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे.
निश्चलनीकरणानंतर केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या एक हजारच्या 980 नोटा, पाचशे रूपयांच्या 3200 नोटा अशी एकूण 25 लाख 80 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जुन्या दोन लाख किमतीच्या नोटा आताच्या चलनातील पंचवीस हजारांना बदलून देण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे.
कटकट गेट भागात तीन व्यक्ती रिक्षातून चलनबाह्य झालेल्या नोटा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली. यानुसार सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संबंधित रिक्षा आडवली. या आरोपींना पोलीस असल्याची जाणीव झाल्याने ते बाहेर पडले. यातील शेख उमर नबी नामक आरोपी त्याच्या ताब्यातील पैशांसह पळायला लागला. त्याचा पाठलाग करत पोलिसांनी अन्य दोघांनाही ताब्यात घेतले.
हेही वाचा - औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आरोपींकडे सापडलेल्या बॅगमध्ये 25 लाख 80 हजारांची रक्कम सापडली आहे. शेख उमर शेख गुलामनबी, शेख मोईन शेख मुनीर, सैय्यद अझरुद्यीन सैय्यद अहमद यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात जिन्सी पोलीस स्थानकात कलम 5 व 7 (THE SPECIFIED BANK NOTES ACT) 2017 प्रमाणे कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.