औरंगाबाद - येथील जुना मोंढा भागात तेलाच्या दुकानाला भीषण आलं लागली. आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले असून जीवितहानी झाली नाही. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अचानक बजरंग ट्रेडिंग कंपनीला आग लागली. दुकानात तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.
लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत एक दिवसाआड दुकान उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपासून मोंढ्यासह शहरातील बाजार पेठा बंद आहेत. बुधवारी सकाळी पुन्हा बाजार पाच तासांसाठी उघडणार आहे. मात्र, त्या आधीच जुना मोंढा भागातील बजरंग ट्रेडिंग या तेलाच्या दुकानाला रात्री अचानक आग लागली.
दुकानात तेलाचा साठा असल्याने क्षणात आगीचे लोळ आकाशाला भिडताना दिसून आले. स्थानिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केले. थोड्यावेळात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, दुकानात तेल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी आल्या. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.