औरंगाबाद - आजपासून नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळेच यावेळी कुठलाही महोत्सव साजरा करता येणार नाही, असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यातील देवींचे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. तरही दुर्गाभक्तांची पाऊले आपोआप मंदिराकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..
देवीचे मंदिर बंद असल्याने भक्तांना बाहेरील जाळीतून मुखदर्शन घ्यावे लागले. सकाळी सातच्या सुमारास मंदिर विश्वस्त असलेल्या दानवे कुटुंबीयांनी देवीची विधीवत पूजाअर्चा करत घटस्थापना केली. यंदा कोरोनाचे सावट असल्याने भक्तांचा हिरमोड होत असला तरी पुढच्या वर्षी ही महामारी नष्ट होऊ दे अशी कामना भक्तांनी देवीच्या चरणी केली. मंदिर उघडली तर नवरात्रात मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याचं कर्णपुरा मंदिर विश्वस्त शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी सांगितले.