औरंगाबाद - जन्म दिल्याच्या 24 तासानंतर जन्म दिलेल्या आईनेच बाळाला सोडून रुग्णालयातून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत घाटी रुग्णालय प्रशासनाने तक्रार देण्यास उशीर केल्याने २ सप्टेंबर रोजी अखेर बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणून गुन्हा दाखल करण्यास विलंब -
घाटीच्या निवासी डॉक्टर प्रविण सुखदेवे (२४) यांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ ऑगस्ट रोजी गर्भवती एक महिला घाटी रुग्णालयाच्या प्रसुती विभागात दाखल झाली होती. ३० ऑगस्ट रोजी प्रसूती होऊन तीने बाळाला जन्म दिला. त्याच्यानंतर 24 तास उपचार देखील घेतले. मात्र, ३० ऑगस्ट रोजी तीने दुपारी अचानक पोबारा केला. घाटी प्रशासनाच्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी परिसरात बराच वेळ शोध घेतला. बेगमपुरा पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी देखील बाळाच्या आईचा शोध सुरू केला. मात्र, ती मिळून आली नाही. यात तक्रार कोणी द्यायची, या प्रकरणात घाटी प्रशासनाने चक्क २ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. परिणामी, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला.