औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला आहे. शरद पवार हे कोणत्याही जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. आता मी बोलल्यावर त्यांनी छत्रपतींचे नाव घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचे म्हटले होते, असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे. ( Raj Thackeray Criticized Sharad Pawar )
राज ठाकरे म्हणाले की, पवार म्हणत आहेत दोन समाजात हे दुही माजवत आहेत. महाराष्ट्र आणि देशासाठी हे योग्य नाही. मी दुही माजवतोय? पवारसाहेब तुम्ही जाती जाती मध्ये भेद निर्माण केले. मी बोलल्यावर आता शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत. काही तरी व्हिडीओ काढत आहेत. बाजूला शिवाजी महाराजांचे पुस्तक ठेवत आहेत. मी म्हटले पवार नास्तिक आहे. त्यानंतर देवाचे फोटो काढत आहेत. कशाला फोटो काढता. सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या की, माझे वडील नास्तिक आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीमध्ये द्वेष सुरु झाला. जेम्स लेन सारखा माणूस उभा करायचा. त्याने लिहल्यावर त्याच्यावरुन माथी भडकवायची. ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहचवले, त्यांना वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. का तर ते ब्राम्हण आहेत म्हणून? आम्ही जात पात मानत नाही. त्याच्याशी घेणे देणे नाही. राजगडावरील समाधी कोणी बांधली. ती लोकमान्य टिळकांनी बांधली आहे. त्यांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून पाहणार का?, असा सवालही राज ठाकरेंनी पवारांना विचारला आहे.