औरंगाबाद - चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून आम्ही कुठलीही श्रेयवादाची लढाई करत नसून विमानतळासाठी प्रयत्न कोणी केले हे सिंधुदुर्गच्या जनतेला माहीत आहे. प्रोटोकॉलनुसार केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांना प्रोटोकॉल कळतो, मात्र इतरांना नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
'उद्घाटनाबाबतचा वाद संपला'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेकडून टीका केली जात आहे. होत असलेले विमानतळ एमआयडीसीच्या माध्यमातून होत आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल पाळणे महत्त्वाचे असते, हेही सगळ्यांना लक्षात घ्यावे. देशाच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि 9 तारखेच्या उद्घाटनासाठीची वेळ घेतली आहे, असेही ऐकून आहे. त्यामुळे आता उद्घाटनाचा विषय संपला आहे. वरिष्ठांना प्रोटोकॉल कळतात आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाचा वाद संपला असून उद्घाटन नियोजित वेळेत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
'आढावा घेऊन महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय'
महाविद्यालय आणि कॉलेज सुरू होणार, असे मी कधीही म्हटले नाही. तर नोव्हेंबरपासून अकॅडमिक इयर सुरू होणार, असे सांगितले असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आम्ही कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहोत. वाढलेल्या रुग्णसंख्येबाबत आढावा घेऊन त्यानंतरच नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येईल. खासकरून शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही अनेक बाबी तपासून पाहत आहोत. याबाबत मी अथवा मुख्यमंत्री अथवा टास्कफोर्स यांच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. सगळे योग्य आणि व्यवस्थित होत असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. महाविद्यालय सुरू करण्याआधी वसतीगृहात सुरू असलेल्या कोविड सेंटरबाबतचा आढावा घेऊ, नंतरच पुढचा निर्णय घेऊ, असेदेखील सामंत यांनी स्पष्ट केले.