औरंगाबाद - केंद्र आणि राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना पायी न जाण्याचे आवाहन केले होते. तरीसुद्धा अनेक मजूर शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत असल्याचे औरंगाबादमध्ये समोर आले आहे. क्रांतिचौक भागात दुपारी ३० ते ४० मजूर रेल्वे मिळेल या आशेने बसलेले दिसून आले.
पुण्यावरून मध्यप्रदेशला जाण्यासाठी काही लोक पायी निघाले आहेत. पुणे - नगर मार्गे औरंगाबाद आणि माध्यप्रदेश असा मार्ग या मजुरांनी निवडला आहे. औरंगाबादेत आलेल्या मजुरांना गाडीची सोय व्हावी यासाठी नेमकं काय करायचं हे कळत नसल्याने सकाळपासून ते शहरातच भटकंती करत असल्याचे दिसून आले.
करमाडजवळची घटना घडल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कोणीही जीवघेणा प्रवास करू नये सर्वांना आपल्या घरी जाण्यासाठी मोफत व्यवस्था केली जाईल, असे आवाहन केले होते. असे असतानाही औरंगाबादेत अनेक लोक रस्त्याने पायी प्रवास करत असल्याचे समोर आले. दुपारी क्रांतिचौक भागात अनेक लोक बसलेली दिसले.
सामाजिक संस्थांनी पुरवलेले भोजन ते खात होते. या लोकांमध्ये काही महिला आणि लहान मुलेदेखील होती. या लोकांची चौकशी केली असता, सहा दिवसांपूर्वी पुण्याहून पायी प्रवास करत औरंगाबादला ते आले होते. औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून गाडी जाते अशी माहिती मिळाल्याने त्यांनी गाडीसाठी लागणाऱ्या पासची शोधाशोध केली. कोणी जिल्हाधिकारी कार्यालय तर कोणी रेल्वे स्टेशन अशी माहिती देऊन या लोकांना भ्रमात टाकले होते. काही सामाजिक संस्था काम करत असताना त्यांना हे मजूर दिसले. त्यांनी या लोकांना जेवण देऊन जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. अशा मजुरांना घरी जाण्यासाठी योग्य मदत उपलब्ध करून दिल्यास मजुरांवर पायी जाण्याची वेळ येणार नाही किंबहुना करमाडसारख्या घटना घडणार नाही हे नक्की.