औरंगाबाद - एकीकडे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, यासाठी महिला वडाची पुजा करतात. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र महिला वडाच्या झाडाचे पूजन करत आहेत. मात्र, याचवेळी पत्नीपीडितांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 'ही पत्नी आता नको', अशी भावना व्यक्त केली आहे.
संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. मात्र, पत्नी पीडितांवर लग्नाच्या दिवसापासून महामारीहून भीषण संकट ओढावल्याचे ते सांगत आहेत. हे संकट घालवण्यासाठी पुरुषांच्या बाजूचे कायदे देखील नाहीत. त्यामुळे अशा बायका नको, अशी मागणी पत्नीपीडितांनी केली. यासाठी ते मुंजा म्हणून पिंपळाच्या झाडाला साकडे घालत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती पत्नी पीडित संघटनेचे प्रमुख भारत फुलारी यांनी दिली. आता आम्ही पत्नीला विटल्याचे त्यांनी सांगितले.
पत्नीपासून पीडित असलेल्या पुरुषांना न्याय देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पत्नी पीडित आश्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून वटसावित्रीच्या दिवशी महिला हाच नवरा मिळावा अशी मनोकामना करत असताना पत्नीपीडित पुरुष या आश्रमात पिंपळाची पूजा करतात. आत्ताच्या पत्नीसोबत हा शेवटचा जन्म असू दे, अशी मनोकामना पत्नीपीडित पुरुष करतात. देशातील कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहेत. प्रत्येकवेळी फक्त पुरुषच नाही, तर काही वेळा महिला देखील पुरुषांच्या कुटुंबीयांना छळतात, असे या पुरुषांनी सांगितले.
अशावेळी स्त्रियांनी केलेली खोटी तक्रार ग्राह्य धरली जाते आणि पुरुष कायद्याच्या नजरेत दोषी ठरतात. अनेक पुरुष पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतात. मात्र, त्यांना न्याय मिळत नाही. अशी पत्नी पतीला छळण्यासाठी आणखी जन्म मागत असेल, तर तो देऊ नये. हाच शेवटचा जन्म समजावा; अशी विनवणी आजच्या दिवशी पत्नीपीडित पुरुष या आश्रमात करतात. सरकारने पुरुषांच्या बाजूने देखील कायदे करावेत, अशी मागणी पत्नीपीडित संघटनेने केली आहे.