औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी औरंगाबादेत दोन दिवस बाजार पेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत.
हेही वाचा... कोरोनाचा प्रभाव: पुण्यातील मार्केटयार्ड तीन दिवस बंद
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी व्यापारी महासंघातर्फे विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम सुरू करण्यात येत असून काही ठिकाणी पोस्टर तर काही ठिकाणी रिक्षावर भोंगे लावून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनापासून लोकांना आणि व्यापाऱ्यांचा बचाव करण्याबाबत उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य बाजारपेठेत प्रत्येक ठिकाणी हँडवॉश ठेवण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात येणार आहे. शहराच्या काही भागांमध्ये जनजागृतीसाठी भोंगा असलेल्या रिक्षाद्वारे काळजी घेण्यासाठी प्रसार करण्यात येणार आहे. चिखलठाणा येथे महानगरपालिकेच्या दवाखाण्यात विलगीकरण कक्ष व्यापारी महासंघातर्फे तयार करण्यात येणार आहे.
हेही वाचा... कोरोना कहर : जगभरात मागील २४ तासांत १ हजार ९७ जणांचा मृत्यू; चीनपेक्षा इटलीत मृतांची संख्या जास्त
आजाराचा संसर्ग थांबवण्यासाठी दोन दिवसांचा बंद घोषित करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस हा बंद असणार असून सोमवारी मात्र नियमीत बाजारपेठ सुरू असेल. मात्र, सोमवारी दुपारी व्यापारी महासंघाची बैठक घेऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.