औरंगाबाद - आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहनच्या म्हणजेच एसटीच्या विविध संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे. दिवाळीच्या आधी मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनाचा दिला होता इशारा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे वार्षिक, वेतन वाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात द्यावी, यासाठी एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळाचे श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनाचा विचार न केल्यामुळे 27 ऑक्टोबर बुधवार रोजी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस मुकेश पटेल यांनी दिली.
बेमुदत चक्का जाम करण्याचा इशारा
1 एप्रिल 2016पासून शासनाप्रमाणे28 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा, वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के प्रमाणात देण्यात यावा, घरभाडे भत्ता 08, 16, 24 टक्के प्रमाणे देण्यात यावा. शासनाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर देऊन थकबाकी रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी द्यावी अन्यथा राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.