औरंगाबाद - दीड वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर सोमवारी पुन्हा शाळा सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शाळांनी केल्या. त्यात महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत तुतारी आणि ढोल वाजवत मुलांचे स्वागत करण्यात आले. इतकेच नाही तर, येणाऱ्या प्रत्येक मुलाचे तोंड गोड करण्यासाठी त्याला चॉकलेट देण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी मार्ड डॉक्टरांचा संप
तुतारी वाजवत विद्यार्थ्यांचे केले स्वागत
महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेमध्ये तुतारी आणि ढोल वाजवत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी देखील शाळेत येताच आनंदी होऊन नृत्य करत शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर थर्मल गन आणि ऑक्सिमीटरने त्यांची शरीर तपासणी करण्यात आली. शिक्षकांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले, त्यांना चॉकलेट दिले. अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याने विद्यार्थी आनंदाने शाळेत शिरले.
आपल्या मित्र - मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला असून ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक वेळा शिक्षण घेताना अडचण येत होती. मात्र, आता अडचणी येणार नाहीत, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शहरातील 413 शाळांमध्ये वाजली शाळेची घंटा
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. चार ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेता येईल, मुलांना शिक्षण घेता येईल याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील 413 शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 36 हजार 415 विद्यार्थी व 4 हजार 511 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या निमित्ताने पुन्हा शाळेत दाखल होणार आहेत.
नवीन नियमांसह शाळा झाल्या सुरू
शाळा सुरू करत असताना नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालकांचे संमती पत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर, वेगवेगळे अभियान राबवले जात आहेत. शाळा सुरू करत असताना अभ्यासाचा भडिमार न करता विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त शिक्षण विविध उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्गाचे आणि शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांना लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शिक्षकांचे लसीकरण, राबवलेले उपक्रम हे रोजच्या रोज कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी पडल्यास तातडीने त्याची तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - नुकसानग्रस्त भागातील ८१ टक्के पंचनामे पूर्ण, मदतीचा लवकरच निर्णय - वडेट्टीवार