औरंगाबाद - राज्य सरकारमधील तीन पक्षांमध्ये मतमतांतर असल्याचे नेहमी बोलले जाते. केंद्र सरकार राज्यातील मंत्र्यांवर कारवाईचा धडाका लावत असले तरी राज्याचे गृहमंत्री (Home Minister) मात्र संयमाने घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) बड्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे गृहमंत्री पद असावे, अशी इच्छा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी व्यक्त केली आहे.
राज्याला मिळेल नवी दिशा - युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पद देखील होते. तसेच काही आता व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी देखील गृहखाते स्वत:कडे घ्यावे, म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे दोनही पद त्यांच्याकडे असल्याने राज्याला नवी दिशा मिळेल, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले.
सेना गृहखात्यावर नाराज - गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचे सत्र सुरु केले असताना तसेच फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतरही गृहमंत्री वळसे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत नाहीत. त्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहखाते आपल्याकडे घ्यावे, अशी चर्चा होत आहे. त्यातच आता औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उघड भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात नव्या मुद्द्यावर चर्चा सुरु होईल हे नक्की.