औरंगाबाद - राम मंदिर निर्माण कार्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, देवगिरी प्रांतातून 45 कोटी 6 लाखांचा निधी संकलित झाल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन प्रमुख संजय बारगजे यांनी दिली. मंदिर निर्माण कार्यासाठी सर्वधर्मीय राम भक्तांनी निधी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.
33 लाख कुटुंबांनी दिला निधी
15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या महिनाभराच्या काळात देवगिरी प्रांत म्हणजेच खान्देश आणि मराठवाडा या भागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले गेले. महिनाभराच्या या काळात 33 लाख 66 हजार 603 कुटुंबापर्यंत तर अकरा हजार 232 गावांपर्यंत, आणि शहरी भागात 1056 वस्त्यांपर्यंत अभियानांतर्गत राम भक्तांशी संपर्क केला गेला. यामध्ये एक लाख 60 हजार 683 राम भक्तांचा समावेश दिसून आला. घराघरात जाण्यात यश मिळाल्याने एका महिन्यात 45 कोटींहून अधिकचा निधी संकलित करणे शक्य झाल्याची माहिती अभियान प्रमुख संजय आप्पा बारगजे यांनी दिली.
जालण्यातून सर्वाधिक निधी
प्राचीन काळापासून जालना शहराला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. ती म्हणजे "जालना सोने का पालना" अशा या शहराने राम मंदिर निर्माणकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. देवगिरी प्रांतात सर्वाधिक निधी देणारा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख निर्माण झालेली आहे. जालन्यातील 3 रामभक्तांनी प्रत्येकी एक कोटींपेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती संजय बारगजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिळालेल्या निधीचे मूल्यांकन करण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये पंधरा ऑडिटरची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व ऑडिट रिपोर्टवर लक्ष ठेवण्यासाठी एक मुख्य ऑडिटरचीदेखील नेमणूक करण्यात आली होती. सर्व लेखाजोखा हा राम मंदिर ट्रस्टला पाठवण्यात आला असून, निधी संकलित होत असताना सर्वधर्मीय लोकांनी निधी दिला आहे. यामध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चनधर्मियांनीदेखील समावेश असल्याची माहिती बारगजे यांनी दिली.