औरंगाबाद - अनिल देशमुखांना पाठीशी घालणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्याची माफी मागावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान राज्यातील दोन मंत्री गेले आता अनिल परब यांच्यासह आणखी मंत्री लवकरच घरी जातील असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
सचिन वाझे प्रकरणात दोन हजार कोटींपेक्षा जास्त वसुली
सचिन वाझे प्रकरणातील वसुली दोन हजार कोटींपेक्षा जास्त आहे. टीआरपी घोटाळ्यात अस्तित्वात नसलेली वाहिनी दाखवून घोटाळा केला गेला. त्याचबरोबर वसुली बुकींकडून केलेली वसुली, पोलीस दलात बदलीसाठी झालेला घोटाळा. या विविध मार्गांनी ही वसुली झाली आहे. मात्र या घोटाळ्याचे नेमके लाभार्थी कोण? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. अनिल देशमुख ते एकटे होते का? त्यांच्याबरोबर कोण होते याचाही जाब आता विचारला पाहिजे. अनिल परब हे गृहनिर्माण सोबत गृह खातं देखील चालवत होते, असा आरोप देखील किरीट सोमैया यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
'सर्व घोटाळ्यांचे पुरावे सादर केले'
मागील सहा महिन्यांमध्ये जे काही घोटाळे बाहेर काढले आहेत ते सर्व पुराव्यानिशी काढले होते. त्याबाबतचे सर्व कागदपत्रे आपण वेळोवेळी सादर केलेले आहेत. ते नंतर सिद्ध देखील झाल्याचं किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. न्यायालयाने पहिल्याच तारखेला चौकशीचे आदेश दिले आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना पाठीशी घालणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोषी नाहीत का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मनसुख हिरेन यांनी आत्महत्याच केली आहे, असं भासवण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. मात्रा नंतर सर्व सत्य बाहेर आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी केलेली चोरी आणि काळी कामं बाहेर आले की, ऑपरेशन लोटस सारखे मुद्दे बाहेर काढले जातात अशी टीका सोमैया यांनी केली आहे.
हेही वाचा - गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत, दुसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील