औरंगाबाद - 'कोविड रुग्णालय अद्याप तयार नसताना उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला', असा सवाल भाजपा गटनेता प्रमोद राठोड यांनी उपस्थित केला. रुग्णालय अद्याप तयार नाही; आरोग्य कर्मचारी अद्याप नाहीत. यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळत नाही. आधी सुविधा द्या आणि मगच रुग्णालय सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रुग्णालय तयार नसताना उद्घाटन कशासाठी, भाजप गटनेता प्रमोद राठोड यांचा आयुक्तांना प्रश्न जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा परिसरात विशेष कोविड रुग्णालय उभारण्यात आले. कमी कालावधीत रुग्णालय उभे करीत ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 12 जूनला लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण म्हणजे, लोकांवर उपचार सुरू होणे अपेक्षित होते; मात्र उद्घाटन होऊन पाच दिवस झाल्यानंतर देखील अद्याप सेवा सुरू झालेली नाही. यामुळे प्रमोद राठोड यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन दिले आहे. महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादेत 250 खाटांचे विशेष रुग्णालय उभारण्यात आले. एमआयडीसीतर्फे अवघ्या 20 दिवसांत हे रुग्णालय सज्ज केल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. रुग्णांना लवकर सेवा मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळा पार पडल्यावर अनेक रुग्णांनी उपचारासाठी धाव घेतली. मात्र दुसऱ्या दिवशीही रुग्णांची निराशा झाली. कारण रुग्णालयासमोर लोकार्पण झाल्याचा फलक लागला होता. मात्र, अद्याप सेवा सुरू झाली नव्हती. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. संबंधित प्रकरणाबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांना विचारणा करण्यात आली. रुग्णालय अद्याप तयार नसून आम्हाला ताबा मिळाल्यावर सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजपा गटनेता प्रमोद राठोड यांनी नाराजी व्यक्त करत उद्घाटनाचा घाट घातला कशाला, असा प्रश्न उपस्थित केला.
लोकार्पण करण्याआधी रुग्णालय सज्ज झाल्याचे न पाहता उद्घाटनाची घाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदन दिल्याचे राठोड यांनी सांगितले.