औरंगाबाद - खरीप विकविमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत फॉर्म भरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा... परतीच्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील कांदा पिकांचे नुकसान
गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावांतील शेतात पाणी साचले आहे. मका, बाजरी, सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधून माहिती देऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा... हिंगोलीत परतीच्या पावसाचा धुमाकुळ, कपाशीला मोठा फटका
खरीप पीक विमा योजना 2019 बाबत शासन निर्णयानुसार काढणीनंतर बेमोसमी पावसामुळे होणारे नुकसान हे विम्यास पात्र आहे. विमा कंपनीला माहिती दिली तरच शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा विमा मिळेल. मात्र त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीला 24 तासात माहिती कळवावी लागते. शेतकऱ्यांनी 1800116515 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा आणि आपले नुकसान झालेल्या पिकांबाबत अर्ज आपल्या तालुका कृषी कार्यालयात द्यावा. त्यानंतर कृषी विभाग त्याचा पाठपुरावा करतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.