औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासन आणि राज्य अग्निशमन कार्यालयाच्या नावे बनावट नियुक्ती पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या मोबाईलवर आलेल्या एका नियुक्ती पत्राद्वारे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 12 जणांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या लेटर हेडवर तयार झाले नियुक्तीपत्र
बनावट नियुक्ती पत्र सादर केल्याप्रकरणी अग्निशमन विभागाचे प्रमुख आर के सुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महापालिकेच्या लेटर हेडवर बारा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यात आले. त्यावर प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांची बनावट स्वाक्षरीही करण्यात आली आहे. इतकंच नाही तर लेटर हेडवर असलेला आवक-जावक क्रमांकही खोटा असून, या पत्राची माहिती आयुक्तांना व्हाट्सऍपवर मिळाली होती. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. नियुक्ती पत्र दिलेल्या बारा जणांचा शपथविधी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होईल. त्यास राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहतील असे या पत्रात म्हटले होते.
मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भातील माहिती दिली असा आहे घोटाळाअग्निशमन विभागाशी निगडित काही प्रशिक्षण वर्ग खाजगी संस्था चालवित असतात. संस्था चालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविलेले असते. त्यामुळे एखाद्या संस्था चालकाने महापालिका प्रशासनाच्या नावे बनावट लेटर हेड तयार करून त्यावर बारा विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली असेल. या पत्रावर औरंगाबाद महापालिका अंतर्गत महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागातील प्रलंबित उमेदवारांना सामील होण्याबाबत असे नमूद असून निकिता नारायण घोडके यांना हे पत्र देण्यात आले आहे. न्यायालयाच्या लिपिक सहाय्यक व विभाग अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या यावर आहेत असे अग्निशमन विभागाचे प्रमुख आर के सुरे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलउमेश प्रमोदराव चव्हाण, निकिता नारायण घोडके, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, शुभांगी विनोद चव्हाण, प्रतीक प्रमोद चव्हाण, वैभवी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे, मृणाल चंद्रकांत पवार, ओमकार संजयराव जोशी या बारा जणांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा - अनुराग कश्यप, तापसी पन्नु प्रकरणावर काय म्हणाले संजय राऊत; पाहा व्हिडीओ