औरंगाबाद - वाढत्या जागतिकीकरणाच्या काळात स्पर्धा वाढली. कामानिमित्त युवक रोजगारासाठी परराज्यात किंवा परदेशात जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कुटुंबातील वृद्ध आजोबांकडे लक्ष देण्यासाठी,काळजी घेण्यास (Aurangabad helping destitute grandparents) कोणी नसल्याने; अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे 'अँब्युलन्स हेल्प रायडर ग्रुप' (Ambulance Help Rider Group) तर्फे त्यांच्या मदतीसाठी 'वृद्ध मिञ- एक आपुलकीचं नातं' हा उपक्रम (Elderly friend concept implemented) राबवण्यात येत आहे.
यांच्या साठी उपक्रम : शहरात अनेक वृद्ध आजी व आजोबा आहेत. जे एकटे आहेत, परावलंबी आहेत, अनेकांची मुले परदेशात किंवा परगावी नोकरीला असल्याने लक्ष द्यायला कोणी नाही. अश्या आजी आजोबांना बऱ्याचदा छोटी-मोठी कामे करण्यासाठी अनेक अडचणी येतात व त्यांना मदतीसाठी कोणीच उपलब्ध नसते. हिच समस्या लक्षात घेऊन हेल्प रायडर्स तर्फे वृद्धमित्र ही संकल्पना व उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
असा राबवला जाईल उपक्रम : शहरात एकट्या राहणाऱ्या आजी आजोबांची माहिती गोळा करण्याचे काम हेल्प रायडर ग्रुप काही दिवसांपासून करत आहे. त्यांचे मोबाईल क्रमांक घेण्यात आले असून; हेल्प रायडर ग्रुपच्या सदस्यांचे संपर्क क्रमांक आजी-आजोबांना देण्यात आले आहेत. वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. वृध्दांना अडचण किंवा गरज असल्यास त्यांनी सदस्यांना संपर्क करायचा आहे. त्याच बरोबर सदस्य देखील वेळोवेळी आजी आजोबांच्या संपर्कात राहून विचारपूस करणार आहेत. त्यात त्यांना औषधी पुरवणे, दवाखान्यात घेऊन जाणे, काही साहित्य आणण्यास मदत करणे, अशी कामे केली जाणार आल्याची माहिती हेल्प रायडरग्रुपचे संदीप कुलकर्णी यांनी दिली.
संघटनेने केले आवाहन : या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त वृद्धांना लाभ व्हावा, याकरिता प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना या उपक्रमात आमच्या सोबत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी हेल्प रायडर्सशी संपर्क करावा. तसेच संकल्पने विषयी आपल्याला काही विचारायचे असेल अथवा सूचना असतील तर नक्की आमच्याकडे पाठवाव्यात. त्यामुळे आम्हाला काम करण्यास नक्कीच पाठबळ मिळेल, असे आवाहन ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर्स चे मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
या संकल्पनेची सुरवात शहरातील गणेश डोणगावकर यांच्या आधार वृद्धाश्रमात वृद्ध आजी आजोबांना पुष्प गुच्छ देत; केक कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्प रायडर्सचे जेष्ठ सदस्य सुरेश हिंगमिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामसुंदर देशपांडे व मनोज जैन यांची उपस्थिती होती. तसेच हेल्प रायडर्स परिवारातील ॲड.श्रीकांत मिश्रा, प्रसाद कस्तुरे, विनोद अप्पा रुकर, आदित्य भाले, रितेश जैन, महेश बोर्डे,अलका कांदे, अजय साबळे यांसह इतर अनेक हेल्प रायडर्स चे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते.