औरंगाबाद - शहरवासियांना पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही आणि स्वस्त बसू देखील देणार नाही. सरकारची कुंभकर्ण झोप मोडली नाही तर सरकारला कोणीही वाचू शकणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. यानंतर आता पाणीप्रश्नावरून राजकारण तापले आहे. भाजपच्या मोर्चानंतर शिवसेना आणि एमआयएमने भाजपवर जोरदार टीका केली आहे. शहरातील पाणीप्रश्न मांडण्यासाठी भाजपने पैठण गेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालय असा भव्य जल आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.
फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका - आमच्या मुख्यमंत्र्यांनी जर सांगितले की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाहीत. त्यांनी तर सांगितलं की मी म्हणतो म्हणजे सत्य समजा. मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा. नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा कवितेच्या पंक्तीतून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
आमची लढाई परिवर्तनाची - देवेंद्र फडणवीसांनी मोर्चाला संबोधित करताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना औरंगाबादमधली लढाई ही परिवर्तनाची लढाई नाही, परिवर्तन तर होणारच आहे. पण ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. आजचा मोर्चा भाजपाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचं काम भाजपानं केलं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी औरंगाबादचा माणूस तरसलेला आहे. अशावेळी आम्ही शांत बसू शकत नाही. मी सरकारला इशारा देतो हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा इथं पाणी पोहोचेल. तोवर सरकारला रात्रीची झोप लागू देणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सरकारने अनेक योजना बंद पाडल्या - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाचं पोस्टर फाडल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, मला आज कळलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले. पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण जनतेचा आक्रोश कसा थांबवणार? असा सवाल केला. शहरासाठी १६०० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आमच्या काळात मंजूर करण्यात आली मात्र, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. आता या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या वेगाने काम होत राहिले तर २५ वर्ष लागतील. हा मोर्चा भाजपाचा नसून जनतेचा आहे. जनतेचा आक्रोश राज्य सरकारला खाक करेल. औरंगाबाद शहरावर मा. बाळासाहेब ठाकरे यांचे खुप प्रेम होते, शिवसेनेला या शहराने खूप दिले पण त्यांनी शहराला काय दिले असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला. मराठवाड्यासाठी मागील सरकारने आणलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ यांनी रद्द केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
जुम्मे के जुम्मे सरकार - आपल्या भाषणाच्या सुरुवातीला दानवे म्हणाले की पाणी मिळते का ? किती दिवसाला मिळतं ? यावर लोकांनी आठ दिवसाला मिळतं, असे सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी या सरकारचं नवं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार ठेवलं. दानवे म्हणाले की, "हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच सोबत बसत नाहीत, जनतेच्या हिताचा निर्णय घेत नाही. राज्यातला कोणता प्रश्नही सोडवत नाही. यांना जे जमत नाही, त्याचं खापर केंद्रावर फोडतात. यावेळी बोलताना रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री घरातून कामं करतात अशी टीका दानवेंनी केली. ते म्हणाले की, हे सरकार जेलमधून आणि घरातून काम करत. यांचे दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री घरात आहेत. कोरोना काळात आमच्या पक्षाचे आमदार-खासदार बाहेर फिरले पण मुख्यमंत्री बाहेर पडले नाहीत. कोरोना काळात त्यांनी काय घोषणा दिली? माझं कुंटंब माझी जबाबदारी. पण, तुम्ही जबाबदारी स्विकारली नाही. आमचे लोकं जनतेत गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले होते, मुख्यमंत्री घरात आणि आम्ही तुमच्या दारात. त्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले. दानवे पुढे म्हणाले, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली. लोकांना मोफत लस दिली, मोफत राशन दिलं, पण राज्याने काहीच दिलं नाही. आता आमची जनतेकडून एकच अपेक्षा आहे, जनतेनं यांना अद्दल घडवावी. हा मोर्चा फक्त भाजपचा नाही, आम्ही लोकांचा आवाज ऐकला आणि तो आवाज सरकारपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून आमचं काम करतो. तुम्ही आज आमची हाक ऐका. सरकारने जनतेचं ऐकावं, नाहीतर ही जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असंही दानवे म्हणाले.
पाणीपट्टीच्या नावाखाली लोकांना उल्लू बनवून घेतलेले पैसे परत करा - औरंगाबाद पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाणी पट्टीबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात पाण्याबाबत ओरड सुरु झाल्यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी पन्नास टक्के कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुरेसे पाणी मिळणार कधी असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील ( MIM MP Imtiaz Jaleel ) यांच्यासह मनसेने उपस्थित केला ( Imtiaz Jaleel On Water Crisis ) आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यावर आता पाणीपट्टी कमी केली गेली. इतके दिवस अपुरे पाणी दिले, आणि पैसे पूर्ण घेतलेत. पाणी पट्टी कमी करून प्रश्न सुटणार आहे का? महानगर पालिकेने पैसे भरलेल्या नागरिकांचे पैसे परत द्या अशी मागणी एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
भाजपच्या मोर्चात भाडोत्री लोक, शिवसेनेचा आरोप : सोमवारी (दि. 24 मे) पाण्याच्या मुद्द्यावरून भाजपने काढलेल्या जल आक्रोश मोर्चात भाडोत्री लोक आल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे ( MLA Ambadas Danve ) यांनी केला आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या केलेल्या दाव्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांचा पैशांबाबत झालेले संभाषण असणारा हा व्हिडिओ असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) शहरातून जाताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे हे अद्याप स्पष्ट नसले तरी महिलेच्या हातात हंडा असून मोर्चात सहभागी होत असताना तासाच्या हिशोबाने पैसे मिळणार असल्याच महिलेने व्हिडिओत सांगितले.
हेही वाचा - Viral Video : भाजपच्या मोर्चात भाडोत्री लोक, शिवसेनेचा आरोप