औरंगाबाद - आठ महिण्यापूर्वी तलावात बुडून मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलिसांत चार अल्पवयीन मुलांसह महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत मुलाच्या आईने न्यायालयात धाव घेत न्याय मागितला होता.
मागील वर्षी झाला होता रोहनचा मृत्यू
वीटखेडा येथे राहणाऱ्या प्रतिभा शिंदे यांचा मुलगा रोहन 25 ऑगस्ट 2020 रोजी मित्रांसोबत सातारा परिसरात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना बुडून त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सातारा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर प्रतिभा शिंदे खचल्या होत्या, आपल्या दुसऱ्या मुलाला घेऊन त्या माहेर राहण्यासाठी निघून गेल्या. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
सोबतच्या मित्रांनी दिली हत्येची माहिती
रोहनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मित्रांची भेट प्रतिभा शिंदे यांनी घेतली. प्रत्यक्ष घटना बघितलेल्या मुलांनी रोहनला बुडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच प्रतिभा शिंदे यांना जबर धक्का बसला. त्यांनी याबाबत सातारा पोलिसांत तक्रार केली. तेव्हा बुडून मारणाऱ्या एका मुलाच्या कुटुंबाने त्यांना धमकावले होते. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होण्यासाठी प्रतिभा शिंदे यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यावेळेस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी कलम 156(3)प्रमाणे सातारा पोलिसांना या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सातारा पोलिसांत चार अल्पवयीन मुले आणि रोहनला पाण्यात बुडणाऱ्या आरोपी मुलाच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला होता मृत्यू
25 ऑगस्ट 2020 रोजी रोहन पोहण्यासाठी गेला होता. तिथे एका 16 वर्षीय मुलासोबत त्याचा वाद झाला. त्यावेळी त्या मुलाने रोहनचा हात पकडून त्याला तलावात बुडवले. त्यानंतर त्या मुलाने बाहेर येऊन तीन मित्रांना धक्का देऊन त्यांनाही तलावात पाडले. त्यावेळी रोहन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या मुलाने डोके हाताने दाबून त्याला पाण्यात दाबले आणि श्वास गुदमरून तो मरण पावला. ही घटना जर कोणी बाहेर सांगितली तर तुम्हालाही जीवे मारू अशी धमकी त्या मुलाने दिल्याने प्रत्यक्ष साक्षीदारांनी या खुनाबाबत माहिती कोणालाही दिली नाही. त्यामुळे ही माहिती लपवून त्या मुलाला पाठिंबा देणाऱ्या चार जणांनादेखील या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.