औरंगाबाद - शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. त्यामुळे पोलीस निरीक्षक राहत असलेल्या इमारतीमधील सुमारे ५० ते ६० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी आलेल्या अहवालात सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात संजय नगर येथील 4, बायजीपुरा येथे 1 आणि जयभिम नगर येथील 2 अशा रुग्णांचा समावेश असून एकूण रुग्णसंख्या 356 वर गेली आहे.
हेही वाचा... मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजाराच्या पार; आज नवीन 769 रुग्णांचे निदान
औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या निरीक्षकांचा मुलगा नुकताच एक ते दीड महिन्यांपुर्वीच दिल्लीहून औरंगाबादेत परतला होता. दरम्यान, निरीक्षक काम करत असलेल्या ठिकाणच्या दोन जणांना देखील क्वारंटाईन केल्याची माहिती उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली आहे. कोरोनाने आता रेल्वे स्टेशन भागात देखील हातपाय पसरवायला सुरूवात केल्याची माहिती समोर येत आहे.
दोन दिवसांपुर्वी या पोलीस निरीक्षकाच्या मुलाला ताप आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यानंतर स्वत: पोलीस निरीक्षकांना देखील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. रेल्वे स्टेशन भागातील हमालवाडामधील एक संपूर्ण इमारत आणि त्यातील सुमारे ५० ते ६० रहिवाशांना त्यामुळे क्वारंटाईन केले आहे. निरीक्षकांचा २५ वर्षीय मुलगा शहरात कोणाच्या तरी संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वेदांतनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या अगोदरच निरीक्षकांचा मुलगा शहरात आला होता, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.