औरंगाबाद - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मात्र स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी औरंगाबादेत याबाबत माहिती दिली. औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने तसा प्रस्ताव पाठवला असून तशी तयारीही सुरू केल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यासाठी अमित देशमुख आले असता, त्यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संंस्था निवडणुकीबाबत भाष्य केले.
रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, पीपीई कीट यात कमतरता नाही, शासन तशी खबरदारी घेत आहे. माझे कुटुंब माजी जबाबदारी उपक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. त्यामाध्यमातून सामान्य माणसाच्या चाचण्या आणि समोपदेशन केले जात आहे. आरोग्य सेवकांच कौतुक केलं पाहिजे. आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठीच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे झालेल्या कामाची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. प्रगतशील राष्ट्रांपेक्षा चांगल काम राज्याने केले. मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे तपासणीत आपण कमी पडणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या म्हणून रुग्ण कमी झाले असे नाही. कोव्हिडचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. शेवटचा रुग्ण असे पर्यंत चाचण्या पूर्ण क्षमतेने केल्या जात आहेत. मार्गदर्शन तत्वे बदलत आहेत. ऋतू कोणताही असो नियम पाळावे लागणार आहे. राज्यात सध्या सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत सकारात्मकपणे विचार करत आहोत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती देखील अमित देशमुख यांनी यावेळी दिली.