औरंगाबाद - देशद्रोही दाऊद इब्राहिमसोबत काही लिंक असेल तर, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यावर कोणी आक्षेप घेता कामा नये, तथ्य नसेल तर बाहेर येतील. आपण जर काही केलच नाही तर घाबरायचे काय कारण? अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडीने अटक (Nawab Malik Arrest) केली आहे.
पुरावे खोटे असतील तर सिद्ध करा -
मी औरंगाबादमध्ये आहे. मुंबईत काय चाललंय मला माहिती नाही. बॉम्ब स्फोट घडवणाऱयाने मलिक यांचे नाव घेतले त्यामुळे त्यांची चौकशी सुरू असेल. ईडी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी बोलणं योग्य नाही. असे चित्रा वाघ यांनी सांगितले. जसेजसे पुरावे सिद्ध होत आहे तशीतशी कारवाई होत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्याबाबतीत ईडीकडे पुरावे आहेत, त्यामुळे अटक केली आहे. अडीच तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे सादर केले होते. पुरावे खोटे असेल तर ते सिद्ध करा. कारवाई चुकीची नाही, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदारावर कारवाई का नाही?
वैजापूर येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी महिलेला मारहाण केली. तरी सत्ताधारी बोलणार नसेल तर, त्यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. पोलीस आमदाराला पाठीशी घालत आहेत. पोलिसांनी आमदारावर जामीन मिळणारे कलम लावले आहेत. वैजापूरचे आमदार आणि पोलीस निरीक्षकांचे सिडीआर तपासले पाहिजेत. पोलीस निरीक्षकाची चौकशी व्हायला पाहिजे. 8 जानेवारीला देखील आमदार बोरणारेंच्या भावाने एका महिलेला बेदम मारहाण केली त्याचा देखील अजून गुन्हा दाखल नाही. महाराष्ट्रातसुद्धा विनयभंगाच्या केसेसमध्ये बदल करावा यासाठी सरकारकडे मागणी करणार आहोत. राज्यात आमदार, खासदारांची गुन्हे करण्याची हिंमत वाढत चालली आहे. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असे आरोप चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केलेत.