औरंगाबाद - रेल्वे येण्याच्या वेळेत रेल्वे रुळ ओलांडणे दुचाकीस्वारांच्या चांगलेच जीवावर बेतले असते, मात्र दैव बलवत्तर म्हणून नागरिकांमुळे तिघांचे प्राण वाचले. त्यांच्या दुचाकीचा मात्र चुराडा झाला आहे. औरंगाबादच्या संग्रामनगर उड्डाणपुलाजवल ही दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना दुचाकी रुळावर अडकल्याने दुचाकीवरून जाणारे तिघे रुळावर पडले. त्याचवेळी रेल्वे आल्याने तिघांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, आसपासच्या नागरिकांनी तिघांना बाजूला ओढल्याने त्यांचे प्राण वाचले. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ एक दुचाकी बीड रस्त्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत असताना रेल्वे रुळावर अडकली. या दुचाकीवर बसलेले दोन पुरुष आणि एक महिला रेल्वे रुळावर पडले. त्याचवेळी काचीकुडा एक्स्प्रेस त्या रुळावरून आली. दुचाकी उचलण्याचा वेळ नव्हता. जवळ असलेल्या नागरिकांनी क्षणाचा विलंब न करता धाव घेत तिघांनांही लगेच बाजूला ओढले. मुकुंदवाडीकडून स्थानकावर जाणाऱ्या रेल्वेने दुचाकीला जवळपास दोनशे मीटर ओढत नेले आणि पुढे जाऊन रेल्वे थांबली. देव बलवत्तर म्हणून कोणालाही इजा झाली नाही. मात्र, यात दुचाकीचा चुराडा झाला.
दरम्यान, रेल्वेखाली गेलेली दुचाकी काढण्यास जवळपास अर्धातासाचा वेळ लागला. त्यानंतर रेल्वे पुढे स्थाकाकडे गेली. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून रेल्वे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -
जळगावात कार उलटून एकाचा मृत्यू, तिघे जखमी