औरंगाबाद - वाल्मी परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा बुडून दुदैर्वी अंत झाला. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. रोहित दत्ता शिंदे (१५, रा. सातारा परिसर, बीड बायपास) असे मृत बालकाचे नाव आहे.
रोहित शिंदे हा मंगळवारी दुपारी वाल्मी परिसरातील तलावात पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. तलावातील पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याच्या नाका-तोंडात पाणी शिरले. त्यामुळे बेशुध्द होऊन बालक बुडाला. हा प्रकार सोबतच्या मित्रांनी पाहिल्यावर त्याची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख आर. के. सुरे, एल. एम. गायकवाड, ड्युटी इन्चार्ज शरद घाटेशाही, सुजीत कल्याणकर, मयूर कुमावत, प्रसाद शिंदे, इरफान पठाण, अप्पासाहेब गायकवाड, संघदीप बनकर, मनोज राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात रोहित शिंदे याला बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढले. त्याला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.