औरंगाबाद : कोरोना संकटामुळे औरंगाबादेत आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे झाले असतानाच आता शहरातील रक्तसाठाही संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती रक्त संकलन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आधीच रुग्णशय्या अपुऱ्या पडत असताना आता रक्ताचाही तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.
रक्तदान करण्याचे आवाहन
शहरात संचारबंदी लागू असल्याने रक्तदान करण्याची प्रक्रियाही थांबली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रक्त संकलन होत नाहीये. रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने रक्ताअभावी रुग्णांचा मृत्यू होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिक तसेच सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आव्हान करण्यात येत आहे. तसेच कोरोनाची लस घेतल्यानंतर 28 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणापूर्वीच रक्तदान करावे असेही आवाहन करण्यात येत आहे.