औरंगाबाद - लोकसभा निवडणूक सर्वात रंगतदार ठरली आहे. या निवडणुकीत मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मिळाले आहे. तर औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे.
रावसाहेब दानवे यांना सर्वाधिक 3 लाख 32 हजार 815 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना सर्वात कमी 4 हजार 492 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक लक्षवेधी, अशा लढती पहायला मिळाल्या आहेत. दोन राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची लढत असलेल्या या विभागात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला. तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव, सय्यद इम्तियाज जलील, सुभाष झांबड या तीन आमदारांनी निवडणूक लढवली. या लढतीत मराठवाड्यात सर्वात कमी मतांनी का होईना एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांचा विजय झाला. राज्यात सर्वाधिक धक्कादायक निकाल औरंगाबादचा पाहायला मिळाला. या निकालाने शिवसेनेला हक्काची जागा गमवावी लागली.