मुंबई- भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एकूण 7,995 उमेदवारांनी 288 मतदारसंघासाठी 10,905 नामनिर्देशन पत्र अथवा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 2019 मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 5,543 उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे यंदा उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची संख्या मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पटीनं वाढल्याचं दिसून येत आहे.
भाजपा विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक 148 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस 103 जागांवर निवडणूक लढत आहे. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 जागांवर निवडणूक लढवित आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 53 उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. महायुतीनं पाच जागा महायुतीच्या इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. तर दोन जागांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
4 नोव्हेंबरला उमेदवारांच्या संख्येचे चित्र स्पष्ट होणार- महाविकास आघाडीमध्ये (MVA) काँग्रेस 103 जागांवर लढत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव ठाकरे ) 89 आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) 87 जागांवर लढत आहे. महाविकास आघाडीनं मित्रपक्षांना सहा जागा दिल्या आहेत. तर तीन विधानसभा क्षेत्रांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ६ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार की उमेदवार अर्ज मागे घेणार की 4 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या 1,648 तक्रारी - निवडणूक आयोगाला 15 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत C-Vigil या अॅपवर आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 1,646 तक्रारींचे निवडणूक आयोगाकडून निवारण करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं. या तक्रारी कोणत्याही नागरिकाला अॅपवरून करता येतात. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पथकाकडून तपास करून योग्य ती कारवाई केली जाते, असे त्यात म्हटले आहे. विधानसभेच्या निवडणुकाकरिता एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 288 मतदारसंघांसाठी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन सत्ता कुणाची हे चित्र स्ष्ट होणार आहे.
हेही वाचा-