औरंगाबाद - राज्यात धार्मिक सोहळे करत असताना कोरोना वाढणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्राने दिल्या असल्या तरी त्याचा आधार घेत राज्य सरकार धार्मिक स्थळ उघडत नाहीये, सरकार केंद्राच्या आदेशाचा वापर करून देव आणि भक्तांमध्ये दरी निर्माण करत असल्याचा आरोप भाजपा मराठवाडा अध्यात्मिक आघाडीचे समन्वयक संजय जोशी यांनी केला.
एक वर्षांपूर्वी मंदिरे उघडण्यासाठी दिली परवानगी
जून 2020मध्ये केंद्र सरकारने सर्व नियमांचे पालन करून धार्मिक स्थळ उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र तरीदेखील कोरोनाच्या नावाखाली राज्यात फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आल्याचा आरोप अध्यात्म आघाडीचे संजय जोशी यांनी केला. मंदिर उघडावी, भक्तांना देवाचे दर्शन घेऊ द्यावे, मंदिरात प्रवेश घेताना मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे नियम देण्यात आले होते. मात्र असे असूनही अद्याप मंदिरे उघडली नाहीत, मुस्लीम मते मिळवण्यासाठी सरकार असे करत असल्याचा आरोप संजय जोशी यांनी केला.
'राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास भाजपा उघडेल मंदिरे'
धार्मिक स्थळे उघडावी, यासाठी सोमवारी भाजपातर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिरासमोर आंदोलन सुरू असताना भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त झुगारून मंदीर प्रवेश केला. ही एक सुरुवात असून राज्य सरकारने कोविडचे नियम पाळून मंदिरे उघडी करावी, अन्यथा भाजपा राज्यातील सर्व मंदिरे खुली करतील, असा इशारा त्यांनी दिला.