औरंगाबाद - दिल्ली हरयाणा येथील शेतकरी शेती कायद्यांविरोधात आंदोलन करत असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. अण्णा हजारे यांनी आंदोलन करू नये, यासाठी भाजपा नेते धावपळ करताना दिसून येत आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धी गाठत अण्णांना आंदोलन न करण्याचे साकडे घातले आहे.
...म्हणून भाजप नेत्यांची धावपळ
नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणाचे शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. पाच ते सहा वेळा केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात बैठक झाली. मात्र बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केल्याने या आंदोलनाच भांडवल विरोधक करतील याची भीती भाजपाला वाटत आहे. त्यामुळे अण्णांनी आंदोलन करू नये, याबाबत समजूत काढण्यासाठी भाजपा नेते राळेगणसिद्धीकडे जाताना दिसून येत आहेत. त्यातच सोमवारी भाजपा खासदार डॉ. कराड आणि आमदार हरिभाऊ बागडे यांनी अण्णांची भेट घेतली. अण्णांचे आंदोलन वेगळ्या मुद्द्यांसाठी आहे, मात्र त्याचा संदर्भ शेतकरी आंदोलनाशी जोडून विरोधकांनी त्याचे भांडवल करू नये, म्हणून अण्णांना भेटून नवीन कायदा शेतकरी फायद्याचा असल्याचे समजून सांगितल्याचे कराड यांनी सांगितले.
अण्णांचे आंदोलन शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी
अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार असले, तरी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा त्याच्याशी संबंध नसल्याचे कराड यांनी सांगितले. अण्णा हजारे यांची भेट घेऊन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे अण्णांना सांगितले. त्यावेळी मी कायद्याच्या विरोधात नसून 2019साली केंद्र सरकारने काही आश्वासन दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण केली नसल्याचे अण्णांचे मत असून त्याविरोधात ते आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा केंद्रावर नाराज
दिल्ली आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्राने तयार केलेले कायदे रद्द करा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे यांना विनंती केली होती. मात्र अण्णांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र अण्णा नाराज आहेत, हे देखील सत्य असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने आश्वासन पाळले नाही, असा त्यांचा आरोप आहे. कृषिमूल्य आयोग असावा, त्याला स्वायत्तता असावी आणि त्यासाठी विशेष समिती असावी, या मागण्या अण्णांच्या होत्या आणि त्यासाठी ते उपोषण करणार आहेत. त्याबाबत त्यांनी पत्र दिल असून ते पत्र आम्ही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तोडगा काढण्यासाठी आम्ही एक महिन्याचा अवधी मागितला असून अण्णा आपले आंदोलन स्थगित करतील, असा विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.