औरंंगाबाद - देशात इंधन दरवाढीसोबत महागाई उच्चांक गाठत आहे. या वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख स्वत: सायकल चालवत सहभागी झाले होते.
वाढत्या महागाईच्या विरोधात सायकल रॅली -
देशात कोरोना संसर्गांने थैमान घातले असुन गेल्या दिड वर्षात अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे सर्व जनसामान्य हे आर्थिक विवंचनेतून जात आहेत. जनतेला या अडचणीच्या काळात केंद्र सरकारने दिलासा देणे गरजेचे असताना पेट्रोल डिझेलचे दर रोज उच्चांक गाठत आहेत. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रास्त झाली आहे. देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.
कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर -
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीमध्ये कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर पडल्याने सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचा फज्जा उडाला होता.
रॅलीत सायकल गेली चोरीला -
इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी भाडोत्री सायकलसह स्वत:च्या सायकली घेऊन सहभागी झाले होते. दरम्यान ५० ते ६० कार्यकर्त्यासह शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेल्या सायकल रॅलीत प्रभाकर मुठ्ठे यांची ८ हजार ५०० रुपये किंमतीची सायकल चोरीला गेली. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.