औरंगाबाद - कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आरोग्य तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी नागरिकांमध्ये अद्यापही कोरोना विषाणूच्या धोक्याची भीती दिसून येत नाही. मात्र, बिनधास्त झालेल्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी औरंगाबादचा सोमनाथ उर्फ ज्युनिअर चार्ली पुढे सरसावला आहे. सोमनाथ चार्ली चॅप्लिनच्या वेशभूषेत बाजार पेठांमध्ये जाऊन मास्क घालण्याबाबात नागरिकांना विनंती करत आहे.
रस्त्यावर जाऊन मास्क वापरण्यासाठी जनजागृती...
कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका कोणत्याही क्षणी वाढू शकतो. मात्र नागरिक बेसावध राहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन करत नाहीत. चेहऱ्यावर असणारा मास्क मानेवर किंवा हनुवटीवर लावलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेशिस्त नागरिकांना मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी औरंगाबादचा ज्युनियर चार्ली रस्त्यावर उतरला आहे. चार्ली चॅप्लिनच्या स्टाईलमध्ये नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन तो करत आहे. मास्क लावण्यास नकार देणाऱ्या नागरिकांना हात जोडून प्रसंगी पाया पडून मास्क वापरा, अशी विनंती तो करत आहे.
औरंगाबादचा सोमनाथ उर्फ चार्ली नागरिकांना कोरोनाबाबत जागृत करत आहे. मात्र रस्त्यावर त्याच्या कलेतून करण्यात येणाऱ्या जनजागृतीला काही नागरिक गंमत म्हणून पाहत आहेत. सोमनाथ लोकांना मास्क लावा, असे म्हणत असताना काही लोक त्याच्याकडे तो वेडपट असल्यासारखे त्याच्या आवाहानावर हसत आहेत, तर काही लोक दुर्लक्ष करत पुढे जात आहेत. तर काही महाभाग त्याचीच गंमत घेतानाचे प्रसंगही घडत आहेत. मात्र याकडे लक्ष न देता कोणाला हात जोडून तर भर रस्त्यात कोणाच्या पाया पडून सोमनाथ नागरिकांना मास्क लावण्याची विनंती करत आहे. नागरिकांमध्ये विषेतः युवकांमध्ये बेशिस्तपणा वाढला असल्याचे मत मास्क न वापरण्याच्या बाबींवरून ज्युनिअर चार्लीने व्यक्त केले आहे.
औरंगाबादचा सोमनाथ हा परिसरात ज्युनिअर चार्ली म्हणून प्रचलित आहे. चार्ली चॅप्लिनच्या वेशभूषेत असल्यावर तो बोलत नाही. आपल्या भावना किंवा आपल्याला जे सांगायचे आहे ते तो फक्त खाणाखुणा करून सांगतो. हुबेहूब चार्ली सारखा अभिनय करणाऱ्या ज्युनियर चार्लीने कोरोना काळात कोविड संबंधी जनजागृतीचे काम केले. मात्र त्याच बरोबर याआधी अनेकवेळा त्याने समाज प्रबोधनासाठी सामाजिक कार्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला. शहर स्वच्छता असो की पर्यावरण संवर्धन या सामाजिक उपक्रमात सोमनाथने आपला खारीचा वाटा उचलला. आता कोरोनाच्या या काळात त्याने मास्क घालण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेतले आहे. मात्र असे अभियान हाती घेण्याची गरज पडू नये, नागरिकांनी स्वतःचा भान ठेऊन आरोग्याची काळजी घ्यायली हवी असे मत ज्युनिअर चार्लीने व्यक्त केलं.