औरंगाबाद - शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. त्यात कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे 75 खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.
महामारीच्या कायद्यानुसार खासगी डॉक्टरांना सरकारी आरोग्य सेवेत सक्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांकडून 75 डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. यामध्ये 45 फिजिशियन आणि 30 अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या 129 डॉक्टरांची सेवा सरकारी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात अधिग्रहित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयामध्ये 15 फिजिशियन आणि 18 अतिदक्षता तज्ज्ञ, महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात 24 फिजिशियन आणि 6 अतिदक्षता तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. या डॉक्टरांना मासिक एक लाख 25 हजारांचे मानधन देण्यात येणार आहे. त्यांच्या मानधनाचा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या योजनांतून करण्यात येणार आहे.
अधिग्रहित केलेल्या डॉक्टरांना 15 दिवस काम केल्यावर सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. सेवा अधिग्रहित केलेल्या खासगी डॉक्टरांना तात्काळ सेवेत रुजू व्हावे लागणार आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने आदेशाचे पालन केले नाही तर त्यांचे व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार नाही