औरंगाबाद - कोरोनाला ठरवण्यासाठी मास्क हे शस्त्र म्हणून वापरले जात आहे. मात्र मास्क वापरताना येणाऱ्या अडचणी पाहता अनेक जण मास्कचा वापर टाळत आहेत. त्यावर तोडगा म्हणून औरंगाबादच्या युवकांनी पुढाकार घेत पारदर्शक मास्कची निर्मिती केली आहे.
मास्क मुळे टळेल श्वसनाचा त्रास..
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क आवश्यक असला तरी मास्क सतत वापरल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. यासह अनेक अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने औरंगाबाद शहरातील अंकुर अनवट, शुभम शिकारे, सुमित बालुनावर आणि सुरज खरात या युवकांनी तोडगा काढत "जिनिअस इन्स्प्रेशन प्लेस अँड इनोव्हेशन टेक्नोलॉजी रिसर्च फाउंडेशन" या संस्थेमार्फत ट्रान्सफ्रान्स मास्क निर्मिती केली. या मास्कमुळे मास्क आणि नाकासह ओठांमध्ये अंतर असते. परिणामी कितीही वेळ मास्क घातला तरी श्वास घेण्यास त्रास होणार नाही, असा दावा मास्क निर्माते अंकुर अनवट यांनी केला आहे.
तपासणीत मास्क झाला पास..
औरंगाबादच्या युवकांनी तयार केलेला हा मास्क पश्चिम बंगाल येथील लॅबमध्ये तपासण्यात आला. या मास्कमुळे कोरोनापासून बचाव होतो. तसेच ऑक्सिजन पातळी कमी होत नाही. कोणतेही विषाणू मास्कमुळे शरीरात जात नाहीत. त्यामुळे हा मास्क वापरण्यायोग्य असून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती सुरज खरात यांनी दिली.
पारदर्शक मास्कमुळे चेहरा दिसतो पूर्ण..
मास्क घातल्याने चेहरा पूर्ण झाकला जायचा. त्यामुळे आपल्या ओळखीच्या लोकांना ओळखणं देखील अवघड जात होते. विशेषतः महिलांना मास्कचा वापर करणे कंटाळवाणे आहे. मास्क लावल्यावर मेकअपसह लिप्स्टिक खराब होत असल्याने काही महिला मास्कचा वापर टाळून कोरोनाला निमंत्रण देत आहेत, असं वाटत होतं. मात्र या मास्कमुळे चेहरा पूर्ण दिसणार आहे, त्याचबरोबर ओठांपासून मास्क दूर राहणार असल्याने लिप्स्टिक खराब होणार नाही. त्यामुळे हा मास्क महिलांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास मास्क निर्माते अंकुर अनवट यांनी व्यक्त केला आहे.
पारदर्शक मास्कमुळे इतर त्रास होणार कमी..
या मास्कला मागून पट्टीद्वारे कानावर येणारा ताण कमी करण्यात आला आहे. मास्क लावल्यानंतर पाणी पिण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. मास्कच्या खालच्या बाजूने दिलेल्या स्विच मधून आपण गर्दीत मास्क न काढता स्ट्रॉद्वारे पाणी पिऊ शकतो. त्यासोबतच ऑक्सीजन टूब लावण्याची वेळ आली तर मास्कला ऑक्सिजन पाईप लावता येतो. शिवाय खाली दोन फिल्टर देण्यात आलेले आहेत. जे वेगळ्या परिस्थितीत आपला कोरोना पासून बचाव करू शकतात.