औरंगाबाद - रविवारी औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. आतापर्यंत नऊ संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर काही संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्णांची संख्या वाढली तर धावपळ होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून कलाग्राम येथे विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती क्रिडाई तर्फे देण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शासनातर्फे खबदरीचे उपाय केले जात आहेत. रविवारी 59 वर्षीय महिलेचा अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांची उपचार व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, राज्यात आजाराची व्याप्ती पाहता अचानक रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून कलाग्राम येथे शंभर खाटांची व्यवस्था महानगरपालिका आणि क्रिडाई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
एकावेळी शंभर संशयित रुग्णांना विलगीकरण व्यवस्था, सोबत भोजन आणि आरोग्य व्यवस्था उपलब्ध असणार आहे. खबरदारीचे उपाय म्हणून शेंद्रा येथे आणखी शंभर रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केले जाणार असल्याची माहिती क्रिडाईतर्फे देण्यात आली आहे. कलाग्राम येथील व्यवस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.