औरंंगाबाद-कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाच्या निर्देशानुसार १ ते ३१ जुलै या काळात लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात औरंंगाबाद शहरात कलम १४४(१)(३) लागू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ जुलै पर्यंत कलम १४४(१)(३) लागू करण्यात आले आहे. शहरात कलम १४४ लागू असताना शहरात सम-विषम तारखेला बाजारपेठा सुरूच राहणार आहेत. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत.
शहरात १४४ कलम लागू असताना ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहणार नसल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या पूर्वी लॉकडाऊनमध्ये १४४ कलम अंतर्गत अनेक प्रयोग करण्यात आले होते. त्यात संचारबंदी, नाकेबंदी यासह कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बाजारपेठांच्या वेळेत अनेक बदल करण्यात आले होते. सम विषम पद्धतीत सुरुवातीला अनेक जणांनी गर्दी केल्या मुळे या पद्धतीचा आधी बोजवारा उडाला होता. नंतर काही दिवस कडक पद्धतीने लॉकडाऊन पाळण्यात आले होते.
आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पुनःच हरी ओम करण्यात आला आहे. त्या नुसार शहरात देखील सम विषम पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. परंतु सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या पाहता जुलै महिन्यात देखील १४४ कलम अंतर्गत आता संचारबंदी करण्याचा मानस प्रशासनाने ठेवला आहे.