औरंगाबाद - राज्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने खुल्या प्रवर्गातील मेरिट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीचे आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी शहरातील क्रांतिचौक ते शहागंज या दरम्यान मेरिट बचाओ राष्ट्र बचाओ चा नारा देत मोर्चा काढण्यात आला.
राज्यात आरक्षणाचा टक्का वाढला आहे. वाढलेल्या टक्क्यामुळे खुल्या प्रवर्गातील मेरिट मधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मेडिकल, इंजिनियरिंग सारख्या क्षेत्रात संधी असूनही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. आम्ही आरक्षणाचा विरोध करत नाही. मात्र, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये तसेच सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. २६ जानेवारी २०२० रोजी आरक्षणाची मुदत संपत आहे. तेव्हा सरकारने श्वेतपत्रिका काढून आरक्षणाचा कितपत फायदा झाला हे जाहीर करावे, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.