औरंगाबाद - शताब्दी नगर येथील मेघावाले सभागृहातील फोकस चोरी केल्याच्या संशयावरून सभागृहाच्या वॉचमनला सात ते आठ जणांनी हात पाय बांधून दांड्याने मारहाण करत निर्घृण हत्या केली होती. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात आरोपींना तात्काळ अटक केली. आरोपींना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - Water Scheme Aurangabad : औरंगाबादमधील पाणी योजनेच्या कामाची माहिती दर दोन आठवड्यात द्या - न्यायालय
काय होती घटना? - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज शेषराव आव्हाड (वय २७ रा. मेघवाल सभागृह एन १२ हडको) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा मेघावाले सभागृहात काम करत होता. एक महिन्यापूर्वी मनोज याची पत्नी माहेरी गेली असल्याने तो सभागृहात राहत होता. दरम्यान बुधवार २० एप्रिल रोजी खरात यांची मुले घरी येऊन मनोज याला कामासाठी घेऊन गेले. मनोजच्या लहान भावाच्या मोबाईलवर मनोजला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आला. यावेळी मनोजची आई आणि भाऊ तात्काळ त्याला पाहण्यासाठी त्याच्या कामाच्या ठिकाणी असता तो तेथे आढळून आला नाही. त्याला घाटी रुग्णालयात मारहाण केलेल्या तरुणांनी नेले होते. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी मनोजला तपासून मृत घोषित केले होते. दरम्यान, मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मनोजच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे - सागर गणपत खरात, सनी गणपत खरात, सतीश भास्कर खरे, आनंद लक्ष्मण गायकवाड, आनंद भाऊसाहेब सोळसे, अष्टपाल रमेश गवळी, शिवम नरेंद्र तुपे सर्व राहणार टीव्ही सेंटर परिसर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींना 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी - मनोज आव्हाड याला मारहाण करताना त्याच्या रक्ताने माखलेले कपडे त्यासोबतच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले कपडे व साहित्य जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील जरीन दुर्राणी यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी देखील पोलीस कोठडी देऊ नये याकरिता युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सात आरोपींना 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.